निंब दिला रोग तुटाया अंतरी । पोभाळीता वरी आत चरे डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद
तुकोबांच्या अभंगाचे वैशिष्ट्य म्हणजे मोजक्या ओळीत, सोप्या शब्दात खूप असा अर्थ लपलेला असतो. वरील अभंगात सुद्धा तुकोबांनी असाच अर्थ सांगितलेला आहे. *रोग जर समूळ नष्ट करायचा असेल तर त्यासाठी कडूनिंबच द्यावा लागतो भलेही तो कितीही कडू लागला तरी चालेल.* कारण निंबाचा क्षणिक कडवटपणा सहन केला की अंगातला असाध्य असा रोग सहज बरा होऊन जातो.
पण कडुनिंब देण्या ऐवजी जर एखादा वैद्य, आजच्या भाषेत डॉक्टर आपल्या रुग्णाला चोंबाळण्याचे काम करत असेल तर काहीवेळा साठी त्या रुग्णाला वरवर गुदगुदगुल्या होतीलही परंतु त्याच्या शरीरातील आजार मात्र आतल्या आत वाढत जातो. वरचेवर तो गंभीर स्वरूप धारण करतो. किंबहुना काहीकाळ गेल्यानंतर त्या आजाराने तो रुग्ण दगावू सुद्धा शकतो. म्हणून *जगद्गुरू तुकोबाराय आपल्याला व्यावहारिक शहाणपणा शिकवताना म्हणतात वरवर चोंबाळन्यापेक्षा थेट कडुनिंबाची मात्रा वापरायला हवी.*
तुकोबांचा हा व्यावहारिक शहाणपणा शिकवणारा अभंग सध्या आठवण्याचा कारण म्हणजे *सध्या आपल्या देशात असेच चोंबाळण्याचे काम चालू आहे.* ज्यांच्याकडे या देशातील समस्या दूर करण्याची जबाबदारी दिली ते समस्या दूर न करता त्यांचे उदात्तीकरण करत आहेत. तुम्ही म्हणाल काहीही काय सांगता?
उदाहरण देतो. जन्मापासून शारीरिक व्यंग असणाऱ्या व्यक्तीसाठी आपण काय करायला हवे? तर त्या अपंग व्यक्तीला आपल्या शारीरिक कमतरतेवर मात करत त्याचे जगणे सुसह्य झाले पाहिजे असे प्रयत्न करायला हवेत. पण त्यांचे जगणे चांगले व्हावे यासाठी कसलेही प्रयत्न न करता त्यांना केवळ *दिव्यांग* म्हणणे ही त्या शारीरिक विकलांग लोकांची क्रूर थट्टा आहे. समस्येचे उदात्तीकरण केल्याने अथवा तिला गोंडस नाव दिल्याने (तुकोबांच्या शब्दात पोभाळण्याने ) समस्या सुटणार आहे का? तर अजिबात नाही. पण आपल्या देशात सध्या असे सर्रास चालू आहे.
सफाई कर्मचारी. आपल्या प्राणांची पर्वा न करता, आरोग्याची काळजी न करता नको त्या घाणीत काम करत असतो. कित्येक सफाई कर्मचारी साफसफाई करताना मरण पावलेले आहेत. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जावी, त्यांचे प्राण वाचवले जावेत यासाठी शासकीय व प्रशासकीय पातळीवर प्रयत्न व्हायला हवेत. *पण आमचे डॉक्टर काय करतात? तर चार दोन सफाई कर्मचारी बोलावतात, पाच पन्नास टि व्ही चॅनेलवाले बोलावतात आणि त्यांचे पाय धुतात.* असे करण्याने त्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जीवनातील समस्या सुटणार आहेत का? त्याचा रोग दुरुस्त करण्यासाठी पायावर पाणी टाकून पोभाळणे बरे की शासकीय बडगा उगारून कडुनिंब देणे बरे? याचा बुद्धिवंतांनी विचार करावा. *(येथे बुद्धीवन्त म्हणजे किमान बुद्धिमत्ता असणारे असा अर्थ अभिप्रेत आहे)*
जी गोष्ट सफाई कर्मचाऱ्यांची तीच गोष्ट कचरा वेचून आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांची. कचरा म्हणजे काय? तर तुमच्या माझ्या सारख्या लोकांनी आपल्या गरजा भागवून नको असलेली, बिनकामाची गोष्ट रस्त्यावर फेकून दिलेली गोष्ट. *पण या फेकलेल्या कचऱ्याला पाहून सुद्धा आपल्या स्वप्नांचे इमले उभे करणारे करोडो लोक या देशात आहेत.* पण त्यांच्यासाठी कचरा वेचण्याची वेळ न येऊ देता त्यांना रोजगाराचे इतर मार्ग उपलब्ध करून देणे हे झाले तुकोबांच्या शब्दात कडुनिंब देण्याचे कार्य. परंतु असे न करता रेड कार्पेट वर कचरा आयात करून, एअर कंडिशन हॉल मध्ये पन्नास कॅमेऱ्याच्या गर्दीत आपणही कचरा वेचायला बसणे म्हणजे केवळ आणि केवळ पोभाळणे होय. त्यांच्या समवेत बसून एकवेळ कचरा वेचल्याने त्यांच्या जीवनातील समस्या काडीभरसुद्धा कमी होणार नाहीत.
आता ज्या लोकांना दिव्यांग म्हणणे, सफाई कर्मचाऱ्यांचे पादप्रक्षालन करणे (म्हणजे पाय धुणे), कचरा वेचणाऱ्या लोकांसमवेत कचरा वेचणे ही गोष्ट जगाच्या इतिहासात झालेली नाही अशा लोकांसाठी दोन महत्वाचे शब्द. *समजा तुम्हाला एखादा असाध्य आजार झालेला आहे. तुम्ही तो आजार बरा करण्यासाठी एक बहुमतवाला (म्हणजे नामांकित) डॉक्टर निवडला आहे. त्या डॉक्टर कडून उपचार घेतल्याने तुमचा आजार शंभर टक्के कमी होण्याची खात्री आहे. परंतु ज्यावेळी तुम्ही त्या डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात त्यावेळी त्या डॉक्टर ने औषधांची साधी गोळीही न देता जर तुमचे पाय धुण्याचे नाटक सुरु केले तर तुमचा आजार बरा होईल का? तुमच्या अंगावर प्रेमाने हात फिरवल्याने तुमचा आजार बरा होईल का? तुमच्या सोबत एक दोन तास सहानुभूतीने बोलल्याने तुमचा आजार बरा होईल का?* तर अजिबात होणार नाही. उलट दिवसेंदिवस तुमचा आजार गंभीर स्वरूप धारण करेल.
तेव्हा आपण सावध व्हायला हवे. कोणत्या गोष्टीचे उदात्तीकरण केले पाहिजे हे समजून घ्यायला हवे. नाहीतर तुकोबांच्याच शब्दात,
*तुका म्हणे हीत देखण्याशी कळे । पडती आंधळे कुपामाजी ।।*
अंधभक्तीने जे लोक आंधळे झालेले आहेत ते लवकरच कुपात पडल्याशिवाय राहणार नाहीत.
@ डॉ. बालाजी जाधव, औरंगाबाद
मो. ९४२२५२८२९०