एका ९-१० वर्ष्याच्या मुलाने पावसाला तक्रारीवजा विनंती केलेलं हे पत्र...
प्रिय पाऊस,
वि.वि. पत्र लिहण्याचे कारण कि मला तुझ्यावर खूप खूप राग आहे. तू आमच्या
गावाला आला नाहीस म्हणून मी हे पत्र लिहत आहे. तुला पत्र मिळालं कि तू लवकरात लवकर तुझ्या
गावातून आमच्या गावात ये. आमच्या गावात सगळे तुझी वाट बघत आहे. आजोबा म्हणतात तू
नाही आला तर जग उपाशी राहून मरेल, आमच्या घरी आम्ही खूपदा उपाशी राहतो, पण मला
मरायचं नाही आहे, मला शिकून मोठं व्हायचं आहे. आई म्हणते शिकून खूप मोठा साहेब हो.
माझे बाबा पण असेच म्हणायचे. मला मोठं होऊन पोलीस व्हायचं आहे. त्यासाठी मला
आतापासूनच तयारी करायची आहे. बाबानी म्हटलं होत कि आमच्या शेताचे पैसे आले कि ते मला
त्या तालुक्यातल्या मोठ्या दुकानातून रिमोट ची कार आणि मोठीवाली बंदूक देणार. मग मी त्या
बंदुकीने चोरांना मारणार होतो. बाबा माझ्यासोबत चोर पोलीस खेळणार होते.पण .. आता मी
एकटाच आहे .माझ्या बरोबर कुणी नाही खेळायला. आजी आणि आई त्यादिवशी खूप रडत होत्या.
तू माझ्या बाबाला घेऊन गेलास न? आम्हाला का नाही सांगितलं? त्या दिवशीपासून माझे बाबा
शेतातून आलेच नाही परंत. माझे शाळेतले मित्र म्हणतात माझे बाबा देवाघरी गेले. आणि आजी
गोष्ट सांगताना सांगते कि देवबाप्पा पाऊस पाडतो. म्हणजे तू पण देवाच्याच घरी राहतो नं ? मग तू
येताना माझ्या बाबांना पण घेऊन ये.
मी ओरडणार आहे त्यांना खूप. ते मला नवीन दप्तर आणि वह्या पुस्तकं घेऊन देणार
होते. पण त्यांनी मला काहीच घेऊन दिल नाही. आता आमच्या बाई पण मला शाळेत येऊ देत नाही
, माझ्या बाबानी शाळेची फी पण नाही भरली. बाकीच्या मुलांचे बाबा कसे सगळं करतात.शाळा
लागली कि नवीन ड्रेस,दप्तर. नवीन चप्पल पण घेतात. माझ्या बाबानी काहीच नाही केलं तसं.
त्यांना काही पण मागितलं कि ते तुझंच नाव सांगायचे. पाऊस आला कि मग आपलं शेत पिकेल अन
आपल्याकडे खूप सारे पैशे येतील मग मी तुला सगळं घेऊन देईल, फक्त असंच म्हणायचे. मग तू का
नाही आलास रे?
बाबा गेले होते तेव्हा आमच्या घरी टीव्ही मधले खूप लोक आले होते. ते म्हटले होते
कि ते आम्हाला पैसे देणार पण अजून नाही दिले.माझ्या बाबांचा फोटो पण आला होता पेपर
मध्ये.आमच्या शेजारच्या काकूंनी दाखवला होता आईला.
बाबा गेल्यापासून सगळंच बिघडलं. आजीची दम्याची औषध संपली पण कुणीच
आणून नाही दिली अजून. तिला सतत खोकला येत असतो. आजोबाना तर आता चालता-फिरता पण
नाही येत. ते फक्त झोपून असतात. सुसु ला पण नाही उठत. मग आईच करते त्यांचं सगळं. माझे
बाबा आईला नवीन साडी घेऊन देणार होते, कारण तिच्या साड्या फाटल्या होत्या नं. पण ती अजून
पण त्याच साड्या वापरते. मी मोठा झालो कि तिला नवीन साडी घेईल..
मला आता बाबांची खूप आठवण येते. आई ला विचारलं कि बाबा कधी येणार तर ती
रडते. तिला काही घेऊन मागितलं तर मला मारते आणि मग जवळ घेऊन स्वतःच रडते. तिला बघून
आजी आजोबा पण रडतात. मग मला पण रडायला येत. बाबा जेव्हा गेले होते तेव्हा सगळ्यांनी
मिळून माझे केस कापले होते मी तेव्हा पण रडलो होतो. आता मला आधीसारखेच केस आलेत. मला
नेहमी बाबाच केस कापायला घेऊन जायचे.बाबा माझ्यावर कधीच ओरडत नव्हते. त्यांनी मला
माझ्या वाढदिवसाला बॅट पण दिली होती, मला ती खूप खूप आवडते.
पावसा, तू सगळ्यांचा मित्र आहेस नं. मग देवबाप्पा पण तुझा मित्र असेल. त्याला सांग
ना माझ्या बाबांना परत पाठवायला. मी नाही त्यांच्याजवळ कुठला हट्ट करणार. मला नवीन दप्तर
पण नको. मी जुनंच वापरणार. मला रिमोटची गाडी पण नको . पण मला माझे बाबा पाहिजे.
तुला पाहिजे तर मी माझी बॅट पण देतो. मी एकदम छान मुलासारखं वागेल , कुणाला काहीच त्रास
नाही देणार. पण मला माझे बाबा परत दे.
मी हे पत्र आमच्या गावच्या टपालपेटीत टाकेल.पोस्टमन काकांना सांगेल तुझ्या जवळ लवकरात
लवकर द्यायला. म्हणजे तू लवकर येशील आणि कधी कुणाच्या बाबांना नाही घेऊन जाणार.
तुझा,
चैतन्य /चैत्या (माझे बाबा मला चैत्या म्हणायचे)
Article by : - तेजल शिला दिलीप अपाले
संपर्क- अचलपूर, जिल्हा - अमरावती, tejalapale@gmail.com